| खोपोली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका खालापूर तालुक्यातील सावरोली येथील पाताळगंगा नदीवरील पुलाला बसला आहे. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलावरील सुरक्षा रेलिंग वाहून गेल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत असलेला हा पूल खालापूर एमआयडीसी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने तसेच औद्योगिक वाहतूक सुरू असते. रेलिंग तुटल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने कामगारांची मोठी गैरसोय झाली आहे. काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाने पुलावर नवीन सुरक्षा रेलिंग बसविण्याचे काम तातडीने हाती घेतले असून, युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.







