प्लास्टिकमुळे गटारे तुंबण्याचा धोका

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी फेल; नालेसफाईची कामे सुरू

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे सुरू झाली आहेत. शहरातील नाल्यांसह गटारांची कामे केली जात आहेत, पण या गटारांमधील माती इतर टाकाऊ वस्तूंसह प्लास्टिक, तसेच दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याने पालिकेचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.


2005 मध्ये आलेल्या महाप्रलयाला नाल्यांमध्ये अडकलेले प्लास्टिक कारणीभूत ठरले होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने नाल्यात अडकल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून रस्त्यांवर, घरात शिरण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळेच 2005 मध्ये शासनाने पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार्‍या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती तसेच वापरावर बंदी घातली होती; मात्र त्यानंतरही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सुरूच असल्याचे दिसत आहे.

महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी अहोरात्र जनजागृती केली जात होती, परंतु मध्यंतरीच्या काळात मात्र ही चळवळ थंडावल्याचे चित्र आहे. पालिका क्षेत्रात सरसकट प्लास्टिकचा वापर वाढला आहे. शहरातील अनेक ठिकाणी सध्या प्रतिबंधित प्लास्टिकचा खच पडला असल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. मोकळे भूखंड, महामार्ग आणि रस्त्यालगत तसेच नाले आणि गटारांत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याचे आजही निदर्शनास येत आहे. पनवेलसह सिडको वसाहतींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असून अनेक ठिकाणी बिअरच्या बाटल्यांसह प्लास्टिक आढळून येत असल्याने पावसाळ्यात पुन्हा गटारे तुंबण्याचा धोका वाढला आहे.

शाळा, मंदिर परिसरांना विळखा
महिनाभरापासून पनवेल शहर व वसाहतींमधून मान्सूनपूर्व गटारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये बिअरच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. विशेष म्हणजे शाळा तसेच मंदिरांच्या परिसरातील गटारांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याने शाळेच्या आवारातील या मद्यपींना आवरण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Exit mobile version