झेब्रा पट्ट्यांअभावी गतिरोधकांचा धोका

अलिबाग-मुरुड रस्त्यावर दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ

| कोर्लई | वार्ताहर |

अलिबाग-मुरुड रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या डांबरीकरणानंतर गतिरोधकांचीदेखील संख्या वाढली असून, बर्‍याच ठिकाणी या गतिरोधकांना पट्टे, झेब्रा पट्टे नसल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. विशेष करून दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत असून, वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मात्र, याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष दिसून येते आहे.

मुरुड तालुक्यातील अलिबाग-मुरुड रस्त्यावर विहूर एसटी स्टँडजवळ असलेल्या गतिरोधकाला सफेद पट्टे नाहीत, त्यामुळे हे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत. त्यामुळे गतिरोधकावरून दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मुरुड-अलिबाग रस्त्यावर पूर्वी जेवढे गतिरोधक होते. त्यात यंदा डांबरीकरणानंतर वाढ झाली असून, बर्‍याच ठिकाणी सफेद पट्टे मारलेले नसल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेऊन या रस्त्यावरील गतिरोधकांना लवकरात लवकर सफेद झेब्रा पट्टे मारावेत व वाहनचालकांचा दुवा घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version