| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात अपघाताच्या घटनांचे सत्रच सुरु आहे. ऐन गणेशोत्सव सणासुदीच्या काळात जड वाहनांमुळे होणार्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडे 11 वाजण्याच्या सुमारास उरण शहरातील चार फाटा ते करंजादरम्यान असलेल्या द्रोणागिरी हॉटेल समोरील रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात करंजा गावातील रितू कोळी या तरुणीचा बळी गेला आहे.
उरण चार फाटा ते करंजा दिशेने जाणारा डंपर क्रमांक एमएच 46 एफ 7056 जात असताना स्कुटी क्रमांक एम एच 46 टी 8433 वर रितू संजीव कोळी ही 24 वर्षीय तरुणी समांतर दिशेला जात होती. त्याचवेळी रीतूचा तोल जाऊन ती रस्त्यात पडली आणि थेट डंपरच्या मागच्या चाकाच्या खाली आली. उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील रहिवासी रमेश शंकरराव चव्हाण हा चालक डंपर चालवत होता.
या अपघातात रितू गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ गाडे हॉस्पिटल, द्रोणागिरी येथे दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचाराकरिता जसलोक हॉस्पिटल, मुंबई येथे पाठविले. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांमार्फत सांगण्यात आले.