रोहा नगर पालिकेच्या मूकसंमतीने नदीसंवर्धन व सुशोभीकरण प्रकल्पाला काळी टीत

। रोहा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या कुंडलिका नदी संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने करोडोंचा निधी वर्ग केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून कुंडलिका नदी संवर्धनापेक्षा सुशोभीकरण कामावर जास्त भर देण्यात आल्याने देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. या ठिकाणाला भेट देणार्‍या पर्यटकांची दृष्ट लागू नये यासाठी रोहा नगरपालिकेच्या मूकसंमतीने काळी टीत लावण्याचा प्रकार बिनदिक्कत सुरू असल्याची चर्चा रोहेकर नागरिक करत आहेत.
कुंडलिका नदीच्या रोहा व अष्टमी अशा दोन्ही किनारी भराव टाकून तयार केलेला भुखंडावर वॉकिंग ट्रॅक, बगीचा दोन्ही किनारी केलेले वृक्षारोपण, बागबगिचा, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच याच प्रकल्पात होऊ घातलेली शिवसृष्टी ही सर्व कामे रोहे अष्टमी नगरीच्या सौंदर्यात भर टाकण्यास निश्‍चितच मदत करत आहेत.काही दिवसांपूर्वी या सुशोभीकरण व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी विद्युत रोषणाई कमी करण्यात आली होती. पण अंधाराचा फायदा घेत गर्दुल्ले, मद्यशौकीन तसेच प्रेमी युगुल यांचा राबता वाढल्याचे काही जागरूक नागरिकांनी लक्षात आणून दिल्याने विज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मुरुडकडे जाणारे पर्यटक या सुशोभीकरण कामामुळे आकर्षित झाल्याने रोह्याच्या अर्थकारणात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे काहींचा पोटशूळ होऊन या सुंदर प्रकल्पाला नजर लागेल अशी भिती असल्याने रोहा नगरपालिकेच्या मूकसंमतीने नदीकिनारी बांबू, ताडपत्र्या, हातगाड्या यांच्या सहाय्याने झालेल्या अस्ताव्यस्त गर्दीमुळे या सुंदर प्रकल्पाला तीत लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.
सदर प्रकल्प आपल्याच मालकीचा असल्याच्या थाटात या प्रकल्पालगत असणारी मोकळी जागा अडवून ठेवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सदर जागा अडवताना आपण या प्रकल्पाचे सौंदर्य बाधित करत आहोत याचे देखील भान संबंधिताना भान दिसून येत नाही. नगरपालिका या टपर्‍या तरुणांना उत्पन्नाचे साधन म्हणून त्याकडे पहात असेल तरी त्यासाठी रोहा नगरपालिकेने नियोजनबद्ध आखणी करून प्रत्येक प्रभागातील स्वतः व्यवसाय करू इच्छिणार्‍या भूमीपुत्रांना प्राधान्य देऊन कचर्‍याच्या विल्हेवाटीसह, पाणी, शौचालय या सर्व सुविधा असलेले आकर्षक स्टॉल करारपत्र करून देणे आवश्यक होते. पण तसे न होता कुणीही येतो बांबू मारून बुकींग केल्याप्रमाणे वावर सुरू करत आहे. सध्या दुचाकी व चारचाकी वाहने यांचा अनधिकृत वाहनतळ, भटक्या लोकांचे तंबू, रेलींगवर वाळत घातलेले कपडे यामुळे सुशोभीकरणात भर पडत नसून या प्रकल्पाला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी नगरपालिकेच्या मूकसंमतीने काळी तीत लावली जात आहे अशीच चर्चा आहे.

Exit mobile version