गणेश चतुर्थीपूर्वी रो-रो सेवा सुरु करणार; मुंबईहून कोकणात केवळ सहा तासांत पोहोचणार
| मुंबई | प्रतिनिधी |
गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई, विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो-रो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव येथे रो-रो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तात्काळ रो-रो सेवेच्या चाचण्या (ट्रायल रन) करण्यात येणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात, विजयदुर्ग, देवगडला केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. रो-रो सेवेच्या दिवसाला दोन फेऱ्या (येणारी-जाणारी) होणार असून यावेळी बोटीतून एका वेळी 50 ते 60 चारचाकी वाहने आणि 400 ते 500 प्रवासी जाऊ शकतील.
मुंबई ते मांडवा अशी रो-रो सेवा पुरविणाऱ्या एमटूएम कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्गदरम्यान धावणार आहे. ही बोट दोन ते तीन मजली आहे. देवगड, मालवण, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक चांगला पर्याय असेल आणि याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बंदर प्राधिकरणाने व्यक्त केला. तेथे पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेने किमान 10 ते 11 तास प्रवास करावा लागतो, तर एसटीने वाहतूक कोंडीचा सामना करीत 14 तासांहून अधिक वेळ लागतो. लवकरच दर निश्चित करून जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात होईल.
नवा पर्याय उपलब्ध होणार
गणेशोत्सव म्हटलं कि, चाकरमान्यांची पावले गावाकडे वळतात. पंधरा दिवस अगोदरपासून कोकणवासीय गावांमध्ये दाखल होतात. गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्ग हे पर्याय आहेत. कोकण रेल्वेपेक्षा मुंबई-गोवा महामार्गाने एसटीने किंवा खासगी वाहनांनी जाणे चाकरमानी पसंत करतात. मुंबई -गोवा महामार्गाची असणारी परिस्थिती लक्षात घेता वाहतूक कोंडीला चाकरमान्यांना सामोरे जावे लागते. यासाठी रेल्वेने रो-रो सेवा सुरु केली आहेच; परंतु आता सागरी जलप्रवासी वाहतूक करण्यासाठी सागरी मंडळाने परवानगी दिल्याने रो-रो सेवा हा चाकरमान्यांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.







