भालच्या मच्छिमारांची रस्त्याची मागणी

 पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील  भाल विठ्ठलवाडी येथे रस्ता तयार करुन दिला जावा,अशी मागणी परिसरातील मच्छिमारांनी सरकारकडे केलेली आहे.याबाबत कृषीवल टीमने परिसराची पाहणी करुन मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 या गावातील 60 टक्के लोकसंख्या ही मच्छिमारी करत आहेत. मात्र यांना मच्छिमारीसाठी गावापासून रतनकोटया (अरबी समुद्र) पर्यंत दिवसातून 6 वेळा ये-जा करावे लागते. साधारणतः हे अंतर एक ते दीड किमीचे आहे.  उन्हाळयाच्या दिवसात फारसा काही त्रास होत नाही. परंतु पावसाळयात मोठया  ासाला सामोरे जावे लागते.  भालपासून रतनकोटयापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे बांधाबांधा वरूनच. या बांधांवर पावसाळ्यात गुडघा,गुडघाभर  चिखल पडलेला असतो.या चिखलातून पायपीट  करणे सोपे नाही. त्यातच मच्छिमारी केल्यानंतर मच्छी  घेउन गावापर्यंत येताना येथील नागरिकांचे बेहाल होत. कित्येक वेळा शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे मच्छिमारीसाठी जाण्याचा मार्ग करण्यासाठी तोंडी व अर्ज करून विनवण्या केल्या. परंतु , कुणालाही पाझर फुटला नसल्याची कैफीयत विकास म्हात्रे व विजया म्हात्रे यांनी मांडली.
विकास म्हात्रे यांनी सांगितले की, गेली 14 ते 15 वर्ष मी स्वतः मच्छिमारीचा धंदा करत आहे. भरती ओहोटीनुसार आम्हाला समुद्रावर यावे लागते. तसेच मधल्या वेळेत सुध्दा फेरी मारावी लागते. 24 तासामध्ये सहा फेर्‍या तरी आमच्या होतात. यामध्ये कधी कधी तर आम्हाला रात्री अपरात्री यावे लागते. चिखलातून येताना खूप त्रास होतो.  पोटापुढे आणि कुटुंबापुढे त्रासाकडे दुर्लक्ष करावे लागते.असे ते म्हणाले.
विजया म्हात्रे यांनी सांगितले की, आम्हाला मुरूमाची सोय करून दिली तरी आम्ही आमच्या मेहनतीने मुरूम बांधांवर पसरवून रस्ता करू. परंतू, कित्येक वर्ष आम्ही मागणी करून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.  तरी या आमच्या मागणीची लोकप्रतिनिधींनी व शासनाने योग्य ती दखल घेउन आम्हाला पायवाटे पुरता तरी रस्ता करून द्यावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Exit mobile version