। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई शहरातील रस्त्यांवर जागोजागी सुरू असलेले खोदकाम तसेच, लोकलमधून डब्यांची वाहतूक करताना एसी लोकलचा आलेला अडसर याचा मोठा फटका डबेवाल्यांच्या सेवेला बसला आहे. नोकरदारांच्या टेबलावर डबा पोहोचवण्यास साधारण तास ते दीड तासाचा विलंब होत असल्याने डबेवाल्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांच्या सेवेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पिढ्यान्पिढ्यापासून व्यवसाय जपताना वक्तशीरपणाचे व्रत डबेवाल्यांनी काटेकोरपणे जोपासले आहे. कोरोना महामारीनंतर व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, मुंबईकरांना वेळेत डबे पोहोचवण्याचे समीकरण डबेवाल्यांनी विस्कळीत होऊ दिले नव्हते. अलीकडच्या काळात उपनगरी रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या वाढलेल्या फेर्या तसेच, मुंबईतील रस्त्यांवर खोदकामामुळे वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा परिणाम डबेवाल्यांच्या वक्तशीरपणावर झाला आहे. पश्चिम रेल्वेवर 109 तर, मध्य रेल्वेवर 66 एसी लोकल धावत आहेत. या लोकलमध्ये सामान कक्ष नाही. तसेच, तिकीट परवडत नसल्याने एसी लोकलमधून डब्यांची वाहतूक करणे डबेवाल्यांना परवडणारे नाही. एसी लोकलमुळे साध्या लोकलचे वेळापत्रक बदलले आहे. त्याचा जेवणाचे डबे पोहोचवण्याच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे डबेवाले सांगतात. एसी लोकल आणि रस्त्यांवरच्या खोदकामामुळे नोकरदारांना ‘लंच ब्रेक’मध्ये डबे पोहोचवणे मुश्कील झाल्याची खंत डबेवाले व्यक्त करत आहेत.