आंबेवाडीतील रस्त्याला तलावाचे स्वरूप

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महत्त्वाच्या आंबेवाडी नाक्याजवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली सुरुवातीच्या पावसातच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेतील बायपास मार्गासह उड्डाणपुलाखालचा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून, वाहने अत्यंत सावधगिरीने चालवावी लागत आहेत. परिणामी या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोलाड-आंबेवाडी हे परिसरातील सुमारे 70 ते 72 गावांसाठी प्रमुख बाजारपेठेचे केंद्र आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. तसेच धाटाव एमआयडीसी, रोहा, अलिबाग आणि इतर भागांकडे जाणारी-जाणारी जड व हलकी वाहनेही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून धावतात. अशा परिस्थितीत उड्डाणपुलाखाली साचलेले पाणी आणि उखडलेला रस्ता वाहतुकीस गंभीर अडथळा ठरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी संबंधित ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच पावसाळ्यात अशा प्रकारची समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version