वारंवार निवेदने देऊनही रस्ता रखडला

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील निंबेश्वर कुंज, सते स्वागत सोसायटी व निंबेश्वर पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी चेतन पांडुरंग केणी यांनी केला आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार केवळ तोंडी आश्वासने दिली जात असून, काम मात्र सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चेतन केणी यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना दिलेल्या ताज्या निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर 2025 तसेच 12 फेब्रुवारी रोजीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लेखी अर्ज देण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आवश्यक परवानग्या उपलब्ध असूनही काम हेतुपुरस्सर रखडविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सध्या पावसाळ्यात निंबेश्वर कुंज, सते स्वागत सोसायटी व निंबेश्वर पार्ककडे जाणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरात शाळा आणि ज्युनिअर कॉलेज असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता असून, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असा इशारा चेतन केणी यांनी दिला आहे. रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही चेतन केणी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.

Exit mobile version