संतप्त ग्रामस्थांचे चणेरामध्ये तीव्र आंदोलन
| चणेरा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ऊसर-चणेरा या महत्त्वाच्या रस्त्यासाठी शासनाकडून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एवढा निधी खर्चूनही गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या प्रचंड हाल अपेष्टांविरोधात अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ नवीन पनवेलचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली, चणेरा परिसरातील शेकडो ग्रामस्थांच्या सहभागातून चणेरा नाक्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची पूर्वसूचना आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, रोहा पोलीस ठाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश बागुल आणि संबंधित ठेकेदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिली होती. नियोजित वेळेनुसार शेकडो नागरिक चणेरा येथे रस्त्यावर उतरले आणि रोहा-मुरुड मार्ग पूर्णपणे ठप्प केला. संभाव्य तणाव लक्षात घेऊन घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश बागुल घटनास्थळी पोहोचले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांना प्रश्नांच्या भडिमाराने घेरले. “शासनाचा 5 कोटी रुपयांचा निधी खर्चूनही पाच वर्षे काम का रखडले? जनतेला आणखी किती काळ खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार?”, अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. उपअभियंता बागुल यांनी दिलेली उत्तरे आणि मांडलेली भूमिका आंदोलनकर्त्यांना समाधानकारक न वाटल्याने वातावरण आणखी तापले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन रोह्याच्या पोलीस निरीक्षक समीर पाटील यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी येत्या दोन दिवसांत संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, 20 जूनपर्यंत उर्वरित रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती नागरिकांना दिली जाईल, असेही स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही किंवा काम पूर्ण झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आंदोलनात प्रकाश विचारे यांच्यासह सुरेश मोरे, अनिल सालावकर, शंकर दिवकर, सरपंच खांबेरे अतिश मोरे, आत्माराम कासार, गंभे गुरुजी, सखाराम गिजे, आनंद देसाई, भरत पाटील, मनोज भायतांडेल, अशोक सानप, बाबू विचारे, साईनाथ धुळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोव्या संखेने सहभागी झाले होते.
जेल भरो आंदोलनाचा इशारा
यावेळी ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “पाच वर्षे जनतेला खड्ड्यात ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही? हक्काचा रस्ता मिळवण्यासाठी आम्हालाच रस्त्यावर उतरावे का लागते?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास ‘जेल भरो' आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. आता संपूर्ण परिसराचे लक्ष 20 जूनकडे लागले असून, प्रशासन आणि ठेकेदार दिलेला शब्द पाळतात की पुन्हा एकदा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे लागले आहे.
