वनक्षेत्र विभागाकडून रस्त्यांचा सर्व्हे

माडभोम, कोरलवाडी रस्त्याचा मार्ग होणार मोकळा
। रसायनी । वार्ताहर ।
आपटा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील माडभोम आणि कोरलवाडी येथील आदिवासींच्या रस्त्याबाबत वन जमीन अभिलेख विभागाकडून सर्व्हे करण्यात आल्यामुळे या दोन्ही वाड्यांच्या रस्त्याचे 3(2) प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरळवाडी आणि माडभोम ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. गेली अनेक वर्षांपासून या दोन्ही रस्त्यांसाठी स्थानिक रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रुप ग्राम पंचायत आपटाचे सरपंच, सदस्य, ग्राम विकास अधिकारी यांच्यासह या परिसरात सामाजिक काम करणारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था पाठपुरावा करीत आहे. मात्र या रस्त्यांसाठी वनविभागाची जमीन संपादित होत असल्याने वन विभागाने 3(2) च्या प्रस्तावास मंजुरी दिल्याशिवाय हा रस्ता तयार होणार नव्हता. अखेर शनिवारी अलिबाग वनविभाग कार्यालयातील वनक्षेत्र सर्व्हेक्षक नामदेव बनसोडे, पनवेल वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. सोनवणे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, अर्चना ट्रस्टचे कार्यकर्ते रत्नाकर घरत, रा.जि.प. बांधकाम विभागाचे पनवेल उप विभाग शाखा अभियंता अनिल जाधव, कल्हे वन परिमंडळचे वनपाल हेमंत कारंडे, ग्रुप ग्रामपंचायत आपटाचे ग्राम विकास अधिकारी नवनाथ शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर, ग्राम संवर्धनचे कार्यकर्ते तेजस चव्हाण वन रक्षक आप्पासाहेब गोंगडे, सुनीता जाधव, कोरलवाडी ग्रामस्थ गुरुदास वाघे, रवींद्र वाघे यांच्यासह माडभोम आणि कोरलवाडील स्थानिक आदिवासी बांधवांसोबत प्रस्तावित रस्त्याचे सर्वे केल्याने दोन्ही वाड्यांच्या रस्त्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version