चिपळुणातील रस्ते रुंदीकरण पुन्हा रखडले

निधीची कमतरता नागरिकांना त्रास

। चिपळूण । प्रतिनिधी ।
शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी गेली सतरा वर्षे प्रयत्न सुरू आहेत. व्यापार्‍यांच्या जाचक अटी व शर्तींमुळे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सातत्याने भेडसावत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेला कृती योजना तयार करावी लागणार आहे. चिपळूण बाजारपेठेतील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकेरी मार्गावरून प्रवास करतानाही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच दोन्ही बाजूने होणारे पार्किंग आणि मालवाहू गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
शहरातील रस्त्याचे रुंदीकरण झाले तर काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, या अपेक्षेने रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, सतरा वर्षे पालिकेचे प्रयत्न यशस्वी झालेले नाही. शहरात सद्य:स्थितीत 9 मीटर रस्ता आहे. हा रस्ता 15 मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव पालिकेकडून ठेवला आहे. त्याला व्यापार्‍यांकडून विरोध करण्यात आला. व्यापार्‍यांनी या रस्त्याला विरोध केल्यानंतर पालिकेने पंधरा मीटरऐवजी नऊ मीटर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला. सभागृहात या ठरावाला मंजुरी मिळाली. ठरावाप्रमाणे पालिकेने रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. व्यापार्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर सर्वांचा सूर बदलला.

पाच वर्षांत कार्यवाही नाही…
जोपर्यंत पार्किंग व्यवस्था होत नाही, अनधिकृत बांधकामे हटवली जात नाही, बाहेरून कांदे, बटाटेसह अन्य मालाच्या विक्रीसाठी येणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही, विविध संकुलांमध्येमधील पार्किंग अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत रुंदीकरण करू नये, अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे रुंदीकरणाचा विषय रखडला. त्यानंतर मागील पाच वर्षांत त्यावर कार्यवाही झालेली नाही.चिंचनाका, मार्कंडी, शिवनदी पूल, पालिका परिसर, जुना बसस्थानक, गांधी चौक, खाटीकआळी, गुहागर नाका, मुख्य बाजारपेठ या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते


व्यापार्‍यांनी केलेल्या केलेल्या मागण्या रास्त आहेत. कारण काही संकुलानी इमारत परवानगी घेताना आतमध्ये पार्किंग दाखवले आहे. प्रत्यक्षात इमारतीच्या पुढील भागात पायरीसारखे टप्पे तयार करून वाहने आत येणार नाहीत, याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे संकुलाच्या बाहेर मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. शहरात होणार्‍या रुंदीकरणाला व्यापार्‍यांचा विरोध नाही. संकुलांमधील पार्किंग, पालिकेची पार्किंग व्यवस्था हवी. रस्त्यावर भाजी विक्री करणार्‍यांचा प्रश्‍न सोडवावा.

-आशिष रेडीज, चिपळूण

Exit mobile version