। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेतील रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात झाल्याने बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तळा बाजारपेठ ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे.सदर रस्ता बनविताना रस्त्याच्या बाजूचा भाग हा नळाच्या पाईपलाईन साठी खोदण्यात आला होता. मात्र पाईपलाईन टाकून झाल्यानंतरही सदर खोदलेला रस्ता बुजविण्यात आला नसल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला होता व या रस्त्यावरून एसटीची वाहतूक सुरू करण्यात आल्याने अरुंद रस्त्यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.तसेच पाईपलाईन साठी खोदण्यात आलेल्या रस्त्याला लागूनच व्यापार्यांची दुकाने असल्याने या दुकानांमधून ग्राहकांना जाण्यायेणास देखील अडचण निर्माण होत होती.ही बाब वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने दुसर्याच दिवसापासून उर्वरित कामास सुरुवात केली आहे.सदर भागात भराव टाकण्यात आले असून त्यावरती ग्रीट टाकून ठोकले बसविण्यात येणार आहेत.त्यामुळे व्यापार्यांची चिंता मिटली असून उशिरा का होईना परंतु रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात झाल्याने व्यापारी व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.