सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

पर्यटकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-मुरुड या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावर एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण तसेच गटारांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी काम बंद ठेवण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता हिंगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अलिबाग-मुरुड मार्गावर मागील सहा महिन्यांपासून विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ता रुंदीकरण, गटारे बांधकाम आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे अनेक ठिकाणी एकाच वेळी सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. परिणामी, या मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने नागाव, काशीद, मुरुड, कोर्लई यांसारख्या समुद्रकिनारी पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मुंबई, पुणे आणि इतर भागांतून दररोज हजारो पर्यटक या मार्गाने प्रवास करत आहेत. मात्र, रस्त्यावरील कामांमुळे अनेकांना तासन्‌‍तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. नागाव, चौल, रेवदंडा आणि मुरुड परिसरात अनेक वेळा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. हिंगे यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरील कामे थांबवून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच सुरू असलेली कामे नियोजनबद्ध आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version