पी.पी. खारपाटील यांचे असश्वासन
। चिरनेर । प्रतिनिधी ।
चिरनेर गावातील ग्रामपंचायत कार्यालय ते जनरल हॉस्पिटल या दरम्यानच्या मुख्य रहदारीच्या आणि महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरण करण्यात यावे, असा चिरनेर ग्रामपंचायतीमार्फत पी.पी. खारपाटील कंट्रक्शन अँड कंपनीकडे प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला कंपनीकडून सहकार्य करण्याची मान्यता मिळाली आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती पी.पी. खारपाटील यांच्या जन्मदिनानिमित्ताने चिरनेर येथील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपसरपंच सचिन घबाडी यांनी या रस्त्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित करून, या रस्त्याचे काँक्रिटीकरण व मजबुतीकरण करण्याची मागणी कंपनीकडे केली. यानुसार उद्योगपती पी.पी. खारपाटील व उद्योगपती राजेंद्र खारपाटील या बंधूंनी या रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या लक्षात घेऊन, या रस्त्याच्या कामासाठी कंपनीकडून सहकार्य करण्याचे आश्वासन चिरनेर ग्रामपंचायतीला दिले आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाआधीच या रस्त्याचे काम करण्यात येईल असे खारपाटील यांनी स्पष्ट केले.