रस्त्याचे काम दर्जेदार होईल – मुख्याधिकारी

| तळा | वार्ताहर |
तळा बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हे दर्जा राखून पूर्ण केले जाईल, असे आश्‍वासन तळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी दिले. तळा बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी जवळपास 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याचे काम हे इन्स्टिमेंटप्रमाणे न होता निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याअनुषंगाने मुख्याधिकारी यांच्यासह नगरपंचायत कार्यालयात शुक्रवार, दि.22 जुलै रोजी बैठक पार पडली.

या बैठकीत रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशा ठिकाणी दुरुस्ती करून सदर रस्त्याचे काम पूर्णपणे दर्जा राखून करण्यात यावा, अशी सूचना संबंधित ठेकेदाराला दिली असल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले. तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना संबंधित इंजिनिअरने जातीने लक्ष न दिल्याने त्यांनाही लेखी नोटीस बजावून याबाबत खुलासा मागविणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, नगरसेवक रितेश मुंढे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, विलास ठसाळ, मोरेश्‍वर गोरीवले यांसह भाजप पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version