मोकाट गुरांचा रास्ता रोको सुरूच

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनत असताना वर्दळीच्या वाकण-पाली-खोपोली महामार्गावर भर रस्त्यात ही गुरे ठिय्या मारून बसत आहेत. त्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा वाहनांची धडक लागल्याने गुरांना प्राण गमवावे लागत असल्याच्या घटनाही घडत आहे. गुरांच्या या अघोषित ‌‘रास्ता रोको’ बाबत प्रसारमाध्यमांनी वारंवार लक्ष वेधूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

औद्योगिकीकरण झालेल्या सुधागड तालुक्यात शेतीचे प्रमाण कमी आहे. घराजवळ असलेले गुरांचे गोठेही आता दिसेनासे झाले आहेत. यामुळे अनेकांनी गुरे मोकाट सोडली आहेत. या गुरे शहरातील रस्त्यांवर बिनदिक्कतपणे ठिय्या मारत असतात. वाकण-खोपोली महामार्गवर अनेक ठिकाणी या मोकाट गुरांमुळे वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर रस्त्यात बसलेली गुरे चटकन नजरेत येत नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. महामार्गाप्रमाणेच तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवरही गुरेढोरे ठिय्या मारून बसलेली आढळतात. त्यामुळे शहर व तालुक्यात पांजरपोळची व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलेले आहे.

Exit mobile version