माणगावातील रस्ते घेणार मोकळा श्‍वास

गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; पर्यायी मार्ग, दुभाजकामुळे वाहतूक कोंडी फुटणार

| माणगाव | प्रतिनिधी |

आगामी येणार्‍या गणेशोत्सव सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गणेशभक्त मुंबईहून कोकण व तळ कोकणात येत असतात. त्या अनुषंगाने गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा व माणगाव बाजारपेठेत दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यंदा सोडवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे व त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, वाहतूक पोलीस हे संयुक्त वेगवेगळ्या बाजारपेठेतील मार्गाची पाहणी करणार आहेत. तसेच बाजारपेठेत तळ कोकणात जाणार्‍या प्रवाशांना माणगाव बाजारपेठेत अडचण निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे.

माणगाव बायपासचे काम अपूर्ण राहिल्याने माणगाव बाजारपेठेत दरवर्षी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कोकणात व तळकोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना या वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतो. यंदा ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माणगाव पोलीस व नगरपंचायतचे कर्मचारी हातात हात घालून काम करणार आहेत. त्यासाठी माणगावातील महामार्गालगत असणारे बेकायदेशीर फेरीवाले, अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. तसेच रस्त्यावर रेल्वे स्टेशन ते तीनबत्ती नाकादरम्यान दुभाजक बसविण्यात येणार आहेत. तसेच निजामपूर बाजूकडून माणगावमध्ये येणार्‍या वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात येणार आहे. तर मोर्बा बाजूकडून येणार्‍या वाहनांना पर्यायी मार्ग व बसथांबे यांची व्यवस्था शहराबाहेर केली जाणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत अन्य वाहनांची गर्दी होणार नाही. त्यामुळे माणगावातील रस्ते मोकळा श्‍वास घेणार आहेत. त्यासाठी माणगाव पोलीस, नगरपंचायत व एस.टी. महामंडळ नियोजन करीत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव या शहरात महामार्गाच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ असल्याने स्थानिक जनता खरेदीसाठी सतत गर्दी करत असते, तसेच बसस्थानक असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होत असतो. या अनुषंगाने उपाययोजना आखण्यात आली असून, या मार्गावर वाहने पार्किंग न करता अन्य ठिकाणी पर्यायी व्यवस्था पार्किंगची करण्याची सोय आखली जाणार आहे. महामार्गालगत असणार्‍या गटाराच्या पाठीमागे हातगाड्या हटविल्या जाणार आहेत. तसेच रस्त्यालगत खोदलेले नाले, गटारे, ठेकेदारामार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई बाजूकडून येणार्‍या परिवहन बससाठी माणगाव बाहेर बस स्टॉप उभारला जाणार आहे. जेणे करून बसस्थानकात जाणार्‍या बसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच बाजारपेठेतील रिक्षा स्टॉपवर एकच रिक्षा उभी असणार असून, बाकी उर्वरित रिक्षा बाजूला असणार आहेत. नंबर आल्यानंतर एक-एक रिक्षा प्रवाशांसाठी उभी असणार आहे. मुख्य बाजारपेठेत महत्त्वाच्या ठिकाणी स्पीकरवरून सूचना दिल्या जाणार आहेत.

पोलिसांकडून होणार कारवाई
माणगाव बाजारपेठेमध्ये बॅरिकेट्स लावून वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. महामार्गावर तसेच पर्यायी मार्गावर जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. बाजारपेठेत व बाजारपेठेच्या बाहेर पोलिसांचे पथक असणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची लेन तोडणार्‍या वाहन चालकावर कारवाई केली जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाने येणार्‍या जाणार्‍या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात बाजारपेठेत अनधिकृत पार्किंग केल्यास वाहन चालकावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. असे आव्हान माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांनी केले आहे.
Exit mobile version