| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील अनेक विभागातील रस्त्यांवरील विजेचे दिवे बंद अवस्थेत असल्याने येथील बहुसंख्य रस्त्यांवर अंधार दाटलेला दिसून येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे येथे पंचवटी विभागातील रस्तेदेखील अंधारात गुडूप झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना काळोखातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पडणारा मुसळधार पाऊस, दाट धुके आणि येथील गर्द वनराई यामुळे माथेरान शहरात या दिवसांत दिवसादेखील थोडा अंधार जाणवतो. अशात सायंकाळनंतर येथील रस्त्यांवरील पथदिवे महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु माथेरान शहरातील अनेक विभागांतील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. यापैकी येथे पंचवटी नगर परिसरातील पथदिवेदेखील मागील दोन महिन्यांपासून बंद असून, येथील नागरिकांना दररोज काळोखातून वाट काढावी लागत आहे.
पथदिव्यांअभावी अंधारातून चालताना येथे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या माथेरान पालिकेत प्रशासकीय राजवट असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. येथे पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. प्राथमिक सुविधा देण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक येथे करीत आहेत.