रायगडातील रस्ते मृत्यूचे सापळे

अपघात घटले, पण मृत्यू वाढले

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात 264 जणांचा मृत्यू झाला. 552 जण गंभीर जखमी, तर 214 जण किरकोळ जखमी झाले आहेत. 2022 च्या तुलनेत जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर 183 अपघात झाले. यात 74 जणांचा मृत्यू झाला, तर 187 जण गंभीर जखमी झाले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर 69 अपघातांची नोंद झाली. यात 32 जणांचा मृत्यू झाला, तर 72 जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 85 अपघात नोंदविले गेले. यात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण गंभीर जखमी झाले. वडखळ-अलिबाग राष्ट्रीय महामार्गावर 20 अपघात झाले, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला. इतर राज्यमार्गांवर 147 अपघात झाले. ज्यात 68 जणांचा मृत्यू झाला. जिल्हा मार्गांवर 157 अपघातांची नोंद झाली. ज्यात 59 मृत्यू नोंदविले गेले.

जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जखमी होणाऱ्यांची संख्याही घटण्यास सुरुवात झाली आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र, त्याच वेळी अपघातांमधील मृतांची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर स्पीड कॅमेरे बसविल्यानंतर अपघातांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येत आहे. पण, त्याच वेळी मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याने या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अद्यापही जास्त आहे. वर्षभरात हे काम पूर्णत्वाकडे गेले तर अपघातांचे प्रमाण आणखी कमी होईल, असा अंदाज रायगड पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.

अपघातांची कारणे
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. तर, द्रुतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेगमर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गेअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. मुंबई-गोवा महामार्गावर संथ गतीने सुरू असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरते आहे. औद्योगिकीकरणामुळे अरुंद रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहतूक हेदेखील अपघातांचे प्रमुख कारण आहे.
या उपाययोजनांची गरज
मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हरर्जन्स (पर्यायी मार्ग) टाकण्यात आले आहेत. मात्र, पर्यायी मार्गाचे सूचनाफलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो आणि अपघात होतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहनचालकांना सूचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते खालापूरदरम्यान तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करणे, वाहनचालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.


बेदरकार वाहनांवर सातत्याने कारवाई आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत केलेली जनजागृती यामुळे गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अपघातप्रवण क्षेत्र शोधून, त्यावर उपाययोजना करणे, ब्लिंकर्स बसवणे, गाड्यांना रिफ्लेक्टर बसविणे, बाह्यवळण रस्त्याची पूर्वसूचना देणारे फलक लावणे यासारख्या उपाययोजना करत आहोत.

-सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version