श्रीवर्धन मधील रस्ते दुरूस्तीच्या मार्गावर

| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील प्रवासी व वाहनधारक सापडले होते. मात्र, या नवीन वर्षात रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत्या आहेत. तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत्या येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावां दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. आदगाव पासून दिवेआगर पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी गेली वर्षभरात वृत्तपत्रातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

सद्यस्थितीत बोर्लीपंचतन शहराच्या पोहामील नाका ते दत्तमंदिर या 400 मीटर अंतरातील रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. बागमांडला ते हरिहरेश्‍वर या 4 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती नंतर आदगाव ते दिवेआगर, आराठी ते चिखलप तसेच भरडखोल ते आराठी या एकूण 28 किलोमीटर अंतरातील रस्ते होणार असून, यासाठी 13 कोटी निधी वापरण्यात येणार आहे. आता तरी रस्ते सुस्थितीत होतील, हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Exit mobile version