जिल्ह्यातील रस्ते गेले खड्ड्यात

ओव्हरलोड वाहतुकीकडे आरटीओचे दुर्लक्ष
ठेकेदाराच्या नावाने नागरिकांचे खडेबोल

। पेण । प्रतिनिधी ।

सध्या रायगड जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हाच प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. परंतु, ही रस्त्यांची अवस्था पाहता, सर्वसामान्य नागरिक ठेकेदाराच्या नावाने खडेबोल सुनावतात. ङ्गठेकेदार चांगल्या प्रकारे काम करत नाहीफ, असा सूर सतत सर्वसामान्यांचा असतो. परंतु, या खराब रस्त्यांमागे उपप्रादेशिक परिवहन खात्याचा (आर.टी.ओ) देखील तेवढाच हात असल्याचे आमच्या प्रतिनिधींच्या हाती आलेल्या माहितीवरून समजले आहे. परंतु, आरटीओच्या अधिकार्‍यांनी मात्र या बाबीचा स्पष्ट नकार दिला आहे.

प्रत्येक रस्त्याला एक क्षमता ठरलेली असते. त्या क्षमतेच्या वजनाएवढेच वाहन मालाची वाहतूक करू शकते. परंतु, मुंबई-गोवा महामार्गावर सर्रास ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामर्गावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. एकीकडे ठेकेदाकडून निकृष्ट दर्जाचे काम, तर दुसरीकडे ओव्हरलोड वाहतूक यामुळे रस्त्याचे पुरते कंबरडे मोडून खड्डेच खड्डे दिसत आहेत. सर्रास सर्वसामान्य जनतेकडून खड्ड्यांबाबत ठेकेदाराला जबाबदार धरले जाते. परंतु, ठेकेदाराबरोबर ओव्हरलोड वाहन करणारे वाहन जबाबदार आहेत. मात्र, ही ओव्हरलोड करणारी वाहने आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे असणारे घनिष्ट संबंध यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याचे जनतेतून बोलले जात आहे. परंतु, आरटीओने मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतून होणारी कॉईलची वाहतूक ही ओव्हरलोड नसून, ती योग्यप्रकारे असते. परंतु, जर खरंच ओव्हरलोड वाहतूक होत असेल, तर त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ओव्हरलोड वाहतुकीवर आमचे कार्यालय लक्ष ठेवून आहे, त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक निर्दशनास आल्यास त्वरित कारवाई केली जाईल, असे पेणचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी महेश देवकाते यांनी सांगितले.

जेएसडब्ल्यूची अवजड वाहतूक
जेएसडब्ल्यू कंपनीत 300 ते 350 वाहन कॉईल (लोखंडी पत्रा) यांची वाहतूक करत आहेत. साधारणतः एका कॉईलचे वजन 18 टन, 20 टन, 25 टन एवढे असते. मात्र, ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या कॉईल वाहून नेत असतात. एका गाडीमध्ये दोन-दोन कॉईल भरुन वाहतूक होत असते. ही वाहतूक रात्री 10 नंतर सुरु होते. तसेच दिवसभर ही वाहने कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या पंपामध्ये किंवा रिकाम्या जागांवर पार्किंग केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे रस्त्याची पुरती वाट लागते.

Exit mobile version