| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील रस्ते हे आता प्रवासासाठी नसून मृत्यूचे सापळे बनले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. गतिरोधकांच्या नावाखाली उभारलेले उंचवटे आणि त्यांच्या लगत पडलेले भलेमोठे खड्डे यामुळे अपघातांचा धोका गंभीर पातळीवर पोहोचला आहे.
उरणमधील अनेक ठिकाणी गतिरोधकांच्या शेजारीच खोल खड्डे महिनोनमहिने तसेच पडून आहेत. वाहनचालकांना गतिरोधक चुकवताना खड्ड्यात पडायचे आणि खड्डा टाळताना गतिरोधकावर आदळायचे अशी दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे रस्ते थेट जीवघेणे ठरत आहेत. यावर अधिक भर म्हणजे, या गतिरोधकांवर ना पांढरे पट्टे, ना रिफ्लेक्टर, ना कोणतेही सूचनाफलक. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे रस्ते अक्षरशः अदृश्य सापळे बनले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या गंभीर परिस्थितीकडे संबंधित प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उघडपणे होत आहे. अपघात झाल्यावरच का प्रशासन जागे होणार? असा रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे. पावसात हे खड्डे पाण्याखाली जाणार असून, रस्ता आणि खड्डा यामध्ये फरक करणेच अवघड होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर लावावेत, तसेच पडलेले सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. अशी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहिल, असा इशारा उरणकरांनी दिला आहे.







