एमपीसीबीचे अधिकारी घटनास्थळी
दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
। धाटाव । वार्ताहर ।
विषारी वायुगळतीप्रकरणी स्थानिक तहसील प्रशासन, एमपीसीबी प्रशासन गंभीर असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री अचानक विषारी वायूने रोहा, वरसे, रोठ, तळाघर परिसरात अक्षरशः हाहाकार उडाला. विषारी वायूच्या वासाने अनेकांना उलटी झाली. डोळ्यांची जळजळ झाली. श्वसनाचा त्रास जाणवल्याची गंभीर बाब समोर आली. विषारी वायू सोडणार्या संबंधित दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या विषारी वायूची गळती ट्रान्सवर्ड मिश्रित एक्सेल कंपनीची असल्याच्या तक्रारीला खुद्द एमपीसीबीसीचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही.व्ही. किल्लेदार यांनी स्पष्ट दुजोरा दिल्याने संबंधित कंपन्यांवर आता काय कारवाई होते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
धाटाव एमआयडीसीतील ट्रान्सवर्ड, रोहा डायकेम, राठी डायकेम यांसह डीएमसी, सॉल्वे, युनिकेम, थेआ, अन्शूल, क्लरिअंट बहुतेक कंपन्या राजरोस जल, वायू प्रदूषण करीत असल्याचे वारंवार समोर आले. याआधी एमपीसीबीने अन्शूल, ट्रान्सवर्ड, रोहा डायकेम कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली, ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री सात वाजल्यापासून उशिरापर्यंत विषारी वायूची गळती झाल्याने पुन्हा हाहाकार उडाला. ट्रान्सवर्ड कंपनीतून विषारी वायू बाहेर पडत असल्याचे निर्दशनास आले. त्यात एक्सेल कंपनीचा धूर मिश्रित झाल्याची चर्चा सुरू झाली. विषारी वायूने रोहा, वरसे, रोठ, तळाघर परिसरातील नागरिकांना मळमळणे, डोकेदुखी, डोळ्यांची आग झाल्याचे समोर आले. विषारी वायू गळतीने नागरिक प्रचंड संतप्त झाले. विषारी वायू प्रदूषण करणार्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रांत, तहसील प्रशासन जल, वायू प्रदूषण मुद्द्याकडे कधीही लक्ष देत नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, एमपीसीबीचे अधिकारी राज कामत, उत्तम माने यांनी वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने शुक्रवारी संबंधित कंपन्यांची पाहणी केली. आता वायू प्रदूषणाला कोणत्या कंपन्या कारणीभूत आहेत, दोषी कंपन्यांवर काय कारवाई होते? याकडे नव्याने लक्ष लागले आहे.