| पनवेल | वार्ताहर |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला ठाणे येथे सापळा रचून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता.
दयाशंकर जगदीश नारायण मिश्रा हे त्यांचे ताब्यातील ट्रकने पुणे ते जेएनपीटी असा वाहतूक प्रवास करीत असताना पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे, पनवेल एक्झीटजवळ, रस्त्यालगत ट्रक उभा करून हे लघुशंकेकरिता खाली उतरले असता 4 अनोळखी इसमांनी फिर्यादीस हाताबुक्क्याने मारहाण करुन त्यांच्याकडील 7000 रोख रक्कम, 5000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, वाहन चालक परवाना असे जबरीने चोरी करुन पळून गेले. अशा आशयाची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तूत गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा तसेच घटनास्थळावर कोठेही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय गळवे व डी.बी. पथकाने तपास सुरु केला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली होती. परंतु यातील मुख्य आरोपी जयेंद्र उर्फ देवेंद्र तुळशीराम वाघमारे (30) हा फरार होता व त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूूत हे अधिक तपास करीत असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत असताना सदर आरोपी हा ठाणा परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार भोये, तांडेल, सोनकांबळे, पो.शि. खताळ आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले आहे. याच्या अटकेमुळे अनेक दरोडे व जबरी चेोरीचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.