भरदिवसा स्कुटी चालकाची लुटमार

साडे पाच लाख रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार

| माणगाव | सलीम शेख |

म्हसळा-तळेगाव रस्त्यावर मोर्बा गावच्या हद्दीत भरदिवसा अज्ञात इसमांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार आडवी घालून स्कुटी चालकाच्या बॅगेतील साडे पाच लाख रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.31) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार ऍक्टिवा स्कुटी चालक प्रथम प्रभाकर पारवे (वय-21) रा. चिंचवली वाडी- गोरेगाव ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी प्रथम प्रभाकर पारवे हे ऍक्टिवा स्कुटी (एमएच-06-सीसी-7136) घेऊन म्हसळा ते तळेगाव जात असताना, मोर्बा गावच्या हद्दीत आल्यावर त्यांच्या गाडीच्या मागून अचानक एक नंबर नसलेली पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट गाडी येऊन या गाडीतील अज्ञात चालकाने स्कुटीला ओव्हरटेक करून स्कुटीला आडवी लावल्याने प्रथम यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी थांबवली. स्कुटीला पाठीमागे लावलेल्या बॅगेत एका प्लास्टिकच्या पिशवी मधील असणारी 5 लाख 57 हजार 349 रुपयांची रोकड चोरून तीन चोरटे फरार झाले आहेत.

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा रजि. नं. 80/2023 भादंवि संहिता कलम 341, 392, 34 अन्वये दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव श्री. स्वामी व पोलीस निरीक्षक माणगाव राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर हे करीत आहेत.

Exit mobile version