रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

आरटीओच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांना भुर्दंड

| नेरळ | प्रतिनिधी |

नियमानुसार रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणेच रस्त्यावर चालवणे अपेक्षित असताना, त्यास सर्रासपणे फाटा दिला जात आहे. मीटर बसवून पासिंगसाठी आरटीओच्या डोळ्यात धूळ फेकून कार्यालयात शासकीय शुल्क देऊन परमिट घेतले जात आहे. कर्जतचे रिक्षा चालक रिक्षाला मीटर बसवून प्रवाशांकडून त्याप्रमाणे दर आकारत नसून, मीटर बंद करून जादा दर प्रवाशांकडून आकारले जात आहेत. आरटीओच्या दुर्लक्षामुळे रिक्षाचालकांचे फावले असून, सर्वसामान्यांना भुर्दंड पडत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मीटरप्रमाणे आकारणी झाल्यास सर्वसामान्यांची अतिरिक्त शुल्क आकारणीच्या माध्यमातून होणारी लूट थांबू शकते. आरटीओ कडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मनमानी वाढली असून ‌‘मागू ते भाडे’ अशी परिस्थिती कर्जत शहरात निर्माण झाली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले होते, त्यावेळेस उठसूठ रिक्षा विकत घेऊन व्यवसाय करत होते. यामुळे रिक्षाचालकांमुळे शहरात वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. एखाद्या प्रवाशाला मीटरनुसार प्रवास करायचा असेल, तर एकही रिक्षा त्याप्रमाणे चालवत नाही. आम्हाला परवडत नाही, असे सांगितले जाते. तसेच, रिक्षाचालक कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नसल्याचेच उत्तर प्रवाशांना देतात. शहरात अनेक ठिकाणी पॉइंट टू पॉइंट शेअर पद्धतीने किंवा मनमानी पद्धतीनेच वाहतूक केली जात आहे. कर्जत शहरात नगरपरिषद हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, छ. शिवाजी महाराज स्मारक चौक, श्री कपालेश्वर मंदिर, जुनी नगरपरिषद, भिसेगाव श्री अंबे रिक्षा स्टँड, गुंडगे येथील बस डेपोजवळ रिक्षा स्टँड, रेल्वे स्थानकाजवळ स्टँड, श्रीराम पुल असे अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड आहेत.

प्रत्येकाचे भाडे या स्टॉपवर प्रति व्यक्तीनुसार ठरलेले आहे. काही ठिकाणी ही चांगली गोष्ट असली तरी ज्यांना थेट रिक्षा हवी आहे, त्यांची अनेकवेळा पंचाईत होत असल्याचे चित्र आहे. पॉइंट टू पॉइंट सोडून अन्य ठिकाणी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारले जात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच, मीटरप्रमाणे चालण्याची मागणी केल्यानंतर रिक्षाचालक नकार देऊन ‌‘हमरीतुमरी’वर येत येतात. रात्री रिटर्न प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत रिक्षाचालक स्वतःच दर ठरवतात. रात्रीचे भाडेही जादा घेत आहे. त्यामुळे यावर वचक ठेवायला आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड पडत आहे.

माझे वडील हे 82 वर्षाचे आहेत आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात जायचे होते. तर, रिक्षा चालक श्रीराम पुलावरून ते कचेरीवर जाण्यासाठी म्हणजे पाच मिनिटांच्या अंतरावर असतानादेखील अडवणूक करून दोनशे रुपये जाण्याचे आणि तितकेच येण्याचे, तसेच त्यात वेटींग चार्जेस वेगळेच घेत आहे. कर्जतसारख्या ठिकाणी एवढी लुटमार होणे हे चुकीचे असून, त्या संघटनेच्या अध्यक्षांनी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

एक प्रवासी
Exit mobile version