खात्यातुन 40 हजार रुपयांची लूट
। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।
शहरातील औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीत काम करणार्या कामगारांच्या बँक खात्यावर सायबर चोराने त्याच्या खात्यातून 40 हजार रुपये लाटले आहेत.
सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका कामगाराचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यातून सर्व्हिस चार्जचे 45 रुपये कापण्यात आले. हे पैसे का कापण्यात आले, हे विचारण्यासाठी कामगाराने गुगलवर सर्च करून एसबीआयच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवला. त्या नंबरवर फोन केला, मात्र संभाषण झाले नाही. काही वेळाने कामगाराला फोन आला. एसबीआयमधून बोलत असल्याचे भामट्याने सांगितले. कामगाराने 45 रुपये कपात झाल्याचे सांगितले.
तसेच पैसे मिळवायचे असतील तर एनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. कामगाराने तत्काळ अॅप डाऊनलोड केले. अॅपमध्ये खात्याची माहिती भरण्यास सांगितले. कामगाराने तेसुद्धा केले. एटीएमचा असलेला सोळा अंकी नंबरही भामट्याने मागून घेतला. काही वेळातच खात्यातून चार हजार रुपये कमी झाले. त्यानंतर थोड्या वेळाने 40 हजार रुपये गायब झाले. शेवटी केवळ 19 रुपये शिल्लक होते, तेसुद्धा भामट्याने सोडले नाहीत.
दरम्यान, या चोरीची माहिती कामगाराने गुन्हे शाखेला सांगितली. पोलीस भामट्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोणतीही बँक खातेधारकाची वैयक्तिक माहिती, फोन नंबर, पासवर्ड, ईमेलची माहिती मोबाइल फोनसह इतर कोणत्याही साधनाद्वारे विचारत नाही. आपल्या खात्याचे नंबर पासवर्डसह कोणतीच माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहान औरंगाबादच्या सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.