कंदहारच्या विमानतळावर रॉकेट हल्ला

तालिबान्यांचा अफगाणिस्तानमध्ये उच्छाद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री तीन रॉकेट डागण्यात आले. यात एक विमानतळावर, तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमानं रद्द करण्यात आली. विमानतळ अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील 85 भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचं मुख्यालय होतं. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री कंदहार विमानतळाला लक्ष्य करण्यात आलं. तीन रॉकेट विमानतळाच्या दिशेनं डागण्यात आले. यात एक विमानतळाला धडकलं, तर दोन विमानाच्या हवाई पट्ट्यांवर. त्यामुळे रनवेचं नुकसान झालं असून, विमानं रद्द करण्यात आली.

Exit mobile version