| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील यशवंतखार व सानेगाव हद्दीतील जंगल भागात चोरी करून आणलेल्या गोवंश जनावरांना जिवे ठार मारून त्यांची अमानुषपणे कत्तल करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली होती. याबाबत पोलीस पाटील यशवंत जगंम यांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्याला माहिती दिली होती. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी सापळा रचून एका संशयित आरोपीला अटक केली असून, या घटनेतील दुसरा आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, यशवंतखार व सानेगाव हद्दीतील जंगल भागात पाच गुरांची कत्तल झाल्याची घटना घडली होती. यात सानेगाव परिसरात एक बैल अणि एका गायीची कत्तल करण्यात आली होती. तर, यशवंत खार येथील परिसरात एक बैल, एक गाय व कालवडीची हत्या करण्यात आली होती. या जनावरांची कत्तल केलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूला गोमांस आढळून आले होते. सोमवारी सकाळी सानेगाव व यशंवतखार परिसरात एक ग्रामस्थ मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना या ठिकाणी गोमांसाचे तुकडे दिसले. त्यांनी ही बाब सानेगावचे पोलीस पाटील यशवंत जगंम यांना सांगितली असता त्यांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रोहा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपींना पकडण्यासाठी विशेष दोन पथके तयार केली होती. आरोपींनी रात्रीच्या वेळी या गुन्ह्यासाठी काळ्या रंगाच्या जीपचा वापर केला होता. त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने त्यांनी एका पंक्चरवाल्याला फोन केला होता. याबाबत पोलिसांना दोन वेगळे नंबर सापडले होते. त्या अनुषंगाने रोहा पोलिसांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनिस अन्सार पटेल (33, रा. महापोली, ता-भिवंडी, जि. ठाणे) याला निजामपूरा, भिवंडी येथून सपोनि आनंद रावडे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पियो क्र.एमएच-04 डीजे 4760 ताब्यात घेण्याची तरतूद करीत असून, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींपैकी आरोपी जाफर शेख यास त्याचे मु.पो वांगणी, जि. ठाणे येथील घरी पहाटे जाऊन तपासले असता तो मिळाला नसून फरार आहे. याबाबत अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत.
तालुक्यातील गावागावात जे कोण गुरे मालक व शेतकरी आहेत, या मालकांनी आपली गुरे ही गोठ्यात ठेवली पाहिजे, तसेच सर्व पोलीस पाटलांनी आपल्या गावात किती गुरे, कोणत्या रंगाची आहेत, याची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत, असे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी सांगितले.