| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. बँक ऑफ कॅनराकडून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार तर आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये शिष्यवृत्ती शासन देते. कळंब येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव तेथील शिक्षक किशोर पाटील यांच्याकडून तयार करण्यात आला होता. तेथील सहा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. मात्र, शासनाकडून मंजूर झालेली रक्कम विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विलंब लागत होता. मात्र, बँक ऑफ कॅनरामधील अधिकारीवर्गाने प्रयत्न करीत पाचवी ते सातवीमधील तीन आणि आठवी ते दहावीमधील तीन अशा सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.त्याबद्दल जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक के.डी. राऊत यांच्या हस्ते कॅनरा बँकेचे शाखा अधिकारी निलेश यादव आणि कळंब शाखेतील बँक कर्मचारी दिनेश पोसाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक किशोर पाटील, सहदेव चव्हाण हेदेखील उपस्थित होते.