| धाटाव | वार्ताहर |
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात राज्यात विभागीय स्तरावर रोहा नगरपालिका उर्दू शाळेने तृतीय क्रमांक पटकवला आहे. रविवारी(दि. 3) राज्यस्तरावरील निकाल जाहीर झाले.
राज्यातील शैक्षणिक विभागातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत राज्यस्तरीय निकालांची घोषणा झाली. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक अशा 15 सरकारी आणि 15 खासगी शाळांची निवड करण्यात आली. त्यानंतर या 30 शाळांमधून सरकारी आणि खाजगी शाळांचे प्रत्येकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले. अशा सहा शाळांची निवड जिल्ह्यातील निवड समितीने केली. यातील प्रत्येकी दोन शाळा जिल्ह्यातून विभागस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात आल्या. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील हेदवली जिल्हा परिषद शाळेने राज्यात दूसरा व नगरपालिका रोहा-उर्दु शाळेने विभागीय स्तरावर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचे पर्यवेक्षण करण्यात आले.
रोहा उर्दू शाळेच्या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक गजनफर कलाब सर व शिक्षक रियाज मोमिन, इनायत कोंडविलकर, मैमुना जलगांवकर, निलोफर अधिकारी, सबा कारानी, रफत जहाँ, विनायक सकपाळ, आस्मा घोंघरे, जाहेदा पठाण, हिना खान, फिजा नागोठकर, मासूमा पटेल आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भूसे, गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे व प्रशासन अधिकारी संतोष कंटे यांनी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे विशेष कौतुक केले. शाळेच्या या सुयशाबद्दल माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा मुस्लिम वरचा मोहल्ला मुस्लिम समाज उपाध्यक्ष सुलतान पानसरे, सचिव अनिस मोरबेकर, अंजुमन हायस्कुल चेअरमन अ.कादिर रोगे, शिक्षण मंडळ माजी उपसभापती संदीप सरफळे, अष्टमी जमात खजिनदार अफसर कर्जिकर, रोहा खालचा मोहल्ला जमात सदस्य अखलाक नाईक, वरचा मोहल्ला जमात सदस्य इकबाल अनवारे, इम्तियाज नाडकर यांच्या समवेत सर्व समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.