। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
कठोर परीश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेलाअक्षय दत्ता निकम याची दिव्यांग पॅरा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अजमेर राजस्थान येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. आपल्या बहारदार खेळाने अक्षयने उपस्थितांची मने जिंकली.
गावच्या मातीतील कबड्डीला राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर घेऊन जाण्याची किमया साधली ती धामणसई गावच्या या सुपुत्राने आणि रोहा तालुक्यातील कबड्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. आज कबड्डीच्या खेळात राष्ट्रीय पातळीवर रोह्याचे नाव मानने घेतले जाते. धामणसई गावच्या या सुपुत्राच्या खेळाने सगळेच प्रभावित झाले. त्याच्या उत्कृष्ट खेळाने निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले आणि अक्षयची निवड भारतीय संघात झाली. नुकतेच अक्षयचे आगमन रोहे शहरात झाले आणि धामणसई ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील कबड्डीप्रेमींनी अक्षयचे स्वागत जल्लोषात केले. गावातील तरूणांनी खुप सार्या शुभेच्छा तथा अभिनंदन करण्यासाठी अक्षयची भेट घेतली व ढोळ ताशांच्या गजरात अक्षयचे मिरवणूक गावातून काढली तसेच त्याला पुढील वाटचालीस अधिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.