पाच जणांचा बळी, तर 37 नव्या रुग्णांची भर
गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी अनेक नवनवे प्रशासकीय यंत्रणेकडून निर्बंध लावले जात आहेत. तरीदेखील कोरोनाचा वाढता कहर नागरिकांच्या जीवावरच उठला असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी 2 जुलै रोजी एकाच दिवशी पुन्हा पाच कोरोनाबाधित रुणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, तर 37 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा रोहा तालुक्यात संसर्ग व घबराटीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात नवे 37 रुग्णांची भर, तर 34 रुग्णांनी कोरोनावर मात करत ठणठणीत बरे होत घरी परतले. याआधी दोन दिवसांपूर्वी तालुक्यात एकाच दिवशी चार जणांचा बळी गेला. त्यापाठोपाठ शुक्रवारी मोठा धक्का देत पुन्हा उपचारादरम्यान पाच जणांचा बळी गेला आहे. उपचारादरम्यान रुग्णांचा होत असलेला मृत्यू हा आता रोहेकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सातत्याने मृत्यूदरात वाढ होत असल्याने नागरिकांसह प्रशासन चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.