रोह्याचा सुपुत्र बनला न्यायाधीश

श्रेयस धारपची क स्तर न्यायाधीशपदी निवड

| नागोठणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) 18 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2023 या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पाली व रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धनंजय धारप यांचे सुपुत्र श्रेयस धारप यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेच्या निवड प्रक्रियेचा भाग असलेली प्रत्यक्ष मुलाखत नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली. श्रेयसने पुणे येथील आय.एल.एस. लॉ कॉलेज मधून 2022 मध्ये कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर, 2023 मध्ये संभाजी नगर येथे झालेली पूर्व परीक्षा व ऑगस्ट 2024 मध्ये संभाजी नगर येथेच झालेली मुख्य परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईतील माझगाव कोर्ट येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीचा अंतिम टप्पाही श्रेयसने यशस्वीरित्या पूर्ण केला.

सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत तसेच आपले वडील व ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय धारप यांचे मार्गदर्शन याच्या जोरावर श्रेयसने पहिल्याच प्रयत्नात व वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हे यश मिळविले आहे. श्रेयसच्या या यशाबद्दल रोहा व पाली या दोन्ही न्यायालयातील वकीलवर्गातून व रोहा व सुधागड या दोन्ही तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल रोहा वकील संघटनेकडून श्रेयसचा बुधवारी (9) एप्रिल रोजी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ एन. जी. देशमुख यांनी दिली.

Exit mobile version