। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पनवेलच्या न्यायालयात वकील म्हणून काम केलेल्या दोन तरूण वकिलांनी परिक्षेत यश मिळविले आहे. अॅड. वंदना अरविंद चामले आणि अॅड. ऋषिकेश पाटील अशी या दोघांची नावे आहेत.
2022 साली 114 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदासाठी परीक्षा घेण्यात आली. राज्यातून तब्बल 10 हजार प्रथम परीक्षा दिली होती. त्यातून 1 हजार 200 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरले होते. जानेवारी 2025मध्ये 341 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामधून 114 विद्यार्थ्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. त्यामध्ये नवव्या क्रमांकाने वंदना चामले यांनी यश मिळविले आहे. त्याचबरोबर अॅड. ऋषिकेश पाटील हा देखील परिक्षेत 52व्या क्रमांकाने यशस्वी झाला आहे. 2010 साली सुरू झालेल्या विधी महाविद्यालयातून न्यायाधीश होणारा हा पहिला विद्यार्थी ठरला आहे. ऋषिकेश पाटीलचे चुलते अॅड. आर.के. पाटील पनवेलमधील वकील असून त्यानेदेखील दुसर्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आहे.