| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात महिलांसाठी कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 ए बी भिल्लारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड नंदा देशमुख, ॲड नीला तुळपुळे, ॲड निहा राऊत, ॲड मानसी म्हात्रे, ॲड अजिता ओक, ॲड स्मिता धुमाळ, ॲड श्वेता जोशी तसेच जिल्हा न्यायालयाच्या न्याय शाखा अधीक्षक प्रियांका पालवणकर, उच्च श्रेणी लघुलेखक पूजा काळे, अभिलेख शाखा सहायक अधीक्षक शिला काठे, मुख्य न्यायदंडाधिकारी सहायक अधीक्षक प्रिया गुंड, दिवाणी न्यायालय व स्तर सहायक अधीक्षक अश्विनी बागडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वरिष्ठ लिपिक मानसी भायदे,दिवाणी न्यायालय व स्तर कनिष्ठ लिपिक नम्रता पाटील, शिपाई पुष्पा मुरुडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांनी रामायण, महाभारताचे दाखले देत स्त्रियांच्या परिस्थितीचा उल्लेख केला. मध्ययुगीन काळापासून ते ब्रिटिश काळा पर्यंत स्त्रियांची स्थिती तसेच स्वराज्यातील स्त्रियांची स्थिती याचे विश्लेषण केले. त्याचप्रमाणे स्त्री भ्रूणहत्या संदर्भात राजस्थान, कोकण आणि पंजाब मधील परिस्थितीचा आढावा घेत विश्लेषण केले. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिला शिक्षणासाठी दिलेले योगदान याबाबत माहिती दिली. 33 टक्के आरक्षणामुळे महिलांचा सहभाग वाढला व त्यामुळे महिला सक्षमीकरण झाले असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत यांनी सांगितले की, महिलांसाठी जिल्हाभर हा आठवडा कायदे विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी महिलांसाठी कायदेविषयक योजनांची माहिती पोहचवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर व्ही बी पाटील यांनी केले व सूत्रसंचालन ॲड वैशाली बंगेरा यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त न्यायाधीश ईशा घाटगे यांनी केले.