दिव्यांगासाठी अलिबागमध्ये कक्ष ; समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांचा पुढाकार

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
 गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांगांचे स्वतंत्र कक्ष नसल्याने कर्मचार्‍यांसह जिल्ह्यातील दिव्यांगाची फरपट झाली होती. रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरत दिव्यांगाचे अद्यावत कक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी असावे अशी मागणी केली.या मागणीची दखल घेत भोईर यांच्या पुढाकाराने अलिबागमध्ये दिव्यांगासाठी अद्ययावत असे कक्ष उभारण्यात आले असून या कक्षाचा शुभारंभ सोमवारी 19 जूलै रोजी झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा पक्ष प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी आदी समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगाचे कक्ष होते. परंतू त्याठिकाणी जागा अपूरी पडत असल्याने संघटना सदनमध्ये तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कक्ष सुरु केले होते. या कक्षाची अवस्था बिकट झाल्याने समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी याबाबत आवाज उठवून दिव्यांगासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतू त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दिव्यांग कक्ष लांबणीवर गेला. याबाबत प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत निषेध म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर स्वागत कक्षामध्ये बसले होते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. दिलीप भोईर यांच्या या आक्रमक भुमिकेमुळे प्रशासनाला दिव्यांगासाठी कक्ष उभारणीची काम युध्द पातळीवर सुरु करावे लागले. जिल्हा परिषदेच्या पाच टक्के निधीतून सुमारे दहा लाख रुपयांचे अलिबागमध्ये दिव्यांग कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षामध्ये जिल्ह्यातून येणार्‍या दिव्यांगासाठी एकाच ठिकाणी योजनांची माहिती तसेच शासनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने दिव्यांगासाठी अद्ययावत असे कक्ष सुरु झाले असून हे कक्ष सोमवारपासून खुले करण्यात आले.

Exit mobile version