कनकेश्वरचा रोप-वे प्रकल्प रखडला

सहा महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांनी केली होती पाहणी

। रायगड । खास प्रतिनिधी ।

गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढले आहे. मात्र, अद्यापही काही धार्मिक स्थळांना पर्यटन सुविधा देण्यात सरकार कमी पडत आहे. दीड वर्षापूर्वी अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर देवस्थान येथे रोप-वे प्रकल्प सुरु करण्याची घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी केली होती. येथे जागेचे सर्वेक्षण होण्याव्यतिरिक्त कोणतेच काम झाले नसल्याने नाराजीचा सूर आहे.

जिल्हा नियोजन समिती, खासदार, आमदार निधीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास साधण्यात येत आहे. ठिकठिकाणी विविध विकास कामेदेखील सुरु आहेत. विकास साधताना जनतेला अपेक्षित असलेला विकास खरोखरच साधला जात आहे का, हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील रेवस-रेड्डी, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर, रेवस-करंजा पूल, अलिबग-विरार कॉरिडोर, अलिबाग रेल्वे प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामाला गती आलेली नाही.

रायगड जिल्हा हा गेल्या काही वर्षांपासून जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आला आहे. दरवर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पर्यटन उद्योगांमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे योजले होते. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यामध्ये चांगला पुढाकार घेतला होता. त्यामध्ये अलिबाग-वरसोली, श्रीवर्धन-दिवेआगर यासह काही अन्य ठिकाणी गोव्याच्या धर्तीवरील शॅक्स उभारण्यात येणार होते. मात्र, विद्यमान सरकारच्या कालावधीत या कामांनी फारशी गती घेतल्याचे दिसत नाही. कनकेश्वर हे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. जत्रोत्सवदेखील या ठिकाणी होत असतो. मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे भाविकांना पायऱ्या चढून जाणे विशेष करुन आबाल, वयोवृध्द नागरिक आणि महिलांना अत्यंत जिकिरीचे ठरते. यासाठी येथे रोप-वे उभारण्याचे पुढे आले होते.

दरम्यान, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना विकासकामांबाबत काही सांगायचे असल्यास ते पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती देतात. मात्र, विकासकामांचा पाठपुरावा करण्यात ते अलीकडे कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यांनी कनकेश्वर रोप-वे प्रकल्पाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. रोप-वे झाल्यास पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होऊन येथील आर्थिक विकासाची चक्रे गतिमान होणार आहेत.

अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये काही वर्षांपूर्वी अनावरण झाले होते. त्याप्रसंगी कनकेश्वर देवस्थान येथे रोप-वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे खासदार सुनील तटकरे यांनी आश्वासन दिले होते. परंतु, हे काम रखडले आहे. सहा महिन्यांपूर्वी दिल्ली येथील काही अधिकारी आले होते. त्यांनी जागेची पाहणी केली होती. त्यानंतर पुढे काय झाले हे कळले नाही.

आप्पा थळे,
माजी सरपंच, मापगाव
Exit mobile version