| रायगड | प्रतिनिधी |
तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड हा मुख्य व अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला असून, त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी खड्ड्यांची खोलगट तळी बनली होती. पाऊस ओसरूनही परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्याने वाहनचालकांचा त्रास अधिकच वाढला आहे.
रस्त्यावरील काही खड्ड्यांमध्ये फक्त तात्पुरती खडी टाकण्यात आली आहे; मात्र ही खडी सतत रस्त्यावर पसरलेली असल्यामुळे विशेषतः दुचाकीस्वार व सायकलस्वार घसरून अपघातग्रस्त होत आहेत. अनेक जण जखमी होत असून, रस्त्यावर खडी पसरवण्याची सध्याची पद्धत ही धोकादायक असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. रात्री तर रस्ता अधिकच गंभीर स्वरूप धारण करतो, खड्डे व खोलगट भाग दिसतच नाहीत. काही वाहनचालकांना अचानक पुढे येणारे खड्डे टाळण्यासाठी ब्रेक मारावे लागतात आणि मागून येणाऱ्या वाहनांशी धडकण्याची शक्यता निर्माण होते.
येत्या काही दिवसांत आवास-नागेश्वर व कनकेश्वर या धार्मिक यात्रांचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हाभरातून बैलगाड्या, खासगी वाहने, पर्यटन बस या मार्गाने मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत; मात्र सध्याची रस्त्याची अवस्था पाहता यात्रेकरूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. गावकरी, वाहनचालक, सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला निवेदने देऊनही परिस्थिती जशीच्या तशी आहे. ठेकेदार आणि प्रशासन या दोघांचेही निष्क्रिय धोरण म्हणून टीका होत असून, कामाचा नियमित आढावा घेण्याची मागणी पुढे येत आहे.





