महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धा
। पोयनाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या निमंत्रित आंतरजिल्हा निवडचाचणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीचा दुसरा सामना काल पुणे येथील विस्डॉम क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर रायगड विरूद्ध सांगली ह्या संघांमध्ये खेळला गेला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी पारधी हिने धुवाधार फलंदाजी करत स्पर्धेतील लागोपाठ दुसरे शतक झळकावत रायगडच्या संघाला विजय मिळवून दिला आहे. अवघ्या 81 चेंडूंमध्ये 24 चौकाराच्या सहाय्याने तिने नाबाद 119 धावा काढल्या आहेत. याआधी हिंगोली विरूद्ध तिने शतक केले आहे.
सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांच्या समाप्तीनंतर 8 गडी गमावत 190 धावा धावफलकावर नोंदवल्या. सांगली संघाची सलामीची फलंदाज कृष्ण सागरे हिने एका बाजूने सयमी फलंदाजी करत 117 चेंडूमध्ये 111 धावा काढून शतक झळकावले तिला श्रेया जगदाळे हिने दुसर्या बाजूने साथ देत 32 धावा काढल्या. रायगड काढून निषिता विठलानी हिने 4, रोशनी पारधी 2 तर, स्तुती विठलानी हिने 1 फलंदाज बाद केला. 190 धावसंख्येला उत्तर देताना रायगड संघाची कर्णधार रोशनी पारधी हिने चौफेर टोलेबाजी करत स्पर्धेतलं लागोपाठ दुसरं शतक ठोकल. अवघ्या 81 चेंडूमध्ये नाबाद 119 धावा तिने केल्या त्यामध्ये 24 चौकारांचा समावेश होता. मधल्या फळीत अनिश्का वर्मा व स्वरा जगताप यांनी प्रत्येकी 15 धावा काढून संघाला योगदान दिले.
28 व्या षटकात रायगडच्या संघाने सामना 4 गडी राखून जिंकला. रोशनी पारधी हिने स्पर्धेत लागोपाठ दोन शतकं झळकावत रायगडच्या संघाचे अस्तित्व स्पर्धेत कायम ठेवले आहे.रायगडच्या मुलींच्या संघाच्या विजया बद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सहसचिव बशीर चिचकर, सर्व सदस्य, संघ प्रशिक्षक विनय पाटील, संघ व्यवस्थापक प्रज्ञा सकपाळ, प्रशिक्षक आवेश चिंचकर यांनी संघाचे आणि रोशनी पारधीचे अभिनंदन केले आहे.
