। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मांडवा पोर्ट एलएलपी या खासगी कंपनीकडे थकीत असलेली रक्कम अखेर वसूल करण्यात आली. तब्बल सव्वा कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने वसूल केल्याची माहिती समोर येत आहे. प्रवासी जेट्टीचे कार्यचालन व व्यवस्थापनासाठी या कंपनीकडे ही थकीत रक्कम होती.
मांडवा बंदर पर्यटनासह जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. या बंदरावर विविध हॉटेल्स व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे जलवाहतुकीने येणारे पर्यटक व प्रवासी या ठिकाणी येऊन खरेदी करतात. तसेच हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचा आनंदही लुटतात. मांडवा येथील प्रवासी जेट्टीचे कार्यचालन व व्यवस्थापन याकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मांडवा पोर्ट एलएलपी यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्याचा कालावधी 2014 ते 2019 असा होता. परंतु, साडेतीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे करारनामा तात्काळ रद्द करून करारनाम्यातील तरदतुदीप्रमाणे 34 लाख रुपये (प्रतिवर्षी प्रमाणे) साडेतीन वर्षांचे 1 कोटी 19 लाख रुपये वसूल करण्याबरोबरच मांडवा जेट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून केली होती.
मांडवा पोर्ट एलएलपीने करारनाम्यातील तरतुदींचा भंग करून मांडवा जेट्टीवर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे केली असल्याची माहिती देण्यात आली होती. मांडवा पोर्ट एलएलपीने करारनाम्यातील बांधकामे तसेच साडेतीन वर्षे विनाभाडे जेट्टीचा वापर करून तरतुदींचा भंग केला असल्याने या कंपनीसोबतचा करारनामा तात्काळ रद्द करण्यात येऊन कंपनीला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच दि. 17.6.2019 पासून साडेतीन वर्षांचे भाडे मांडवा पोर्ट एलएलपीकडून त्वरित वसूल करावे, अशी मागणी सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत ही कारवाई तीन वर्षांनंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.