पतीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली लेखी तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
घोटवडे येथील प्रसूत महिलेचा मृत्यू डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. मयत सुचिता यांचे पती सुशील थळे यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देऊन संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनुसार डॉ. फुटाणे व रुग्णालयातील नर्स यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील घोटवडे येथील रहिवासी असणारे सुशील थळे यांचे सुचिता थळे (नागवेकर) यांच्यासोबत 28 मार्च 2022 मध्ये लग्न झाले होते. गुण्यागोविंदाने दोघेजण राहात होते. सुचिता या गर्भवती होत्या. डॉ. फुटाणे यांच्या दवाखान्यात ते नियमित तपासणीसाठी येत होते. 24 मार्च 2025 मध्ये त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. 14 एप्रिल रोजी त्या पुन्हा डॉक्टरांकडे उपचारासाठी आले होते. मात्र, त्यांच्या पोटात पाणी कमी असल्याने डॉक्टरांनी सिझर (शस्त्रक्रिया) केले. एका लहान बालकाला त्यांनी जन्म दिला. मात्र, दुसर्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, सुचिता यांचा अगोदर फुटाणे यांच्या दवाखान्यात मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
अलिबागमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. मयत सुचिता थळे यांचे पती सुशील थळे यांनी लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण डॉ. फुटाणे आणि त्यांच्या रुग्णालयातील नर्स यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे समिती गठीत करून जिल्हा शल्यचिकित्सक कधीपर्यंत कारवाईची भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.