गांजा, चरससह 52 किलो 39 ग्रॅम वजनाचा साठा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील रेवदंडा, रसायनी, महाड अशा 12 ठिकाणी छापा टाकून रायगड पोलिसांनी 52 किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. हा साठा नवी मुंबई येथील एका कंपनीत नष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये 50 किलो गांजा व दीड किलो चरस आदींचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसायासाठी येणार्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकीकरणदेखील वाढत आहे. पर्यटक व नोकरी व्यवसायासाठी येणार्या नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार काही ठिकाणी गांजा, चरसचे पाकीट विकले जात आहेत. काही ठिकाणी महाविद्यालयीन तरुण मंडळी या अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्याचा धोकादेखील कायम आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, महाड, मांडवा, रसायनी, मुरूड, खोपोली, गोरेगाव, वडखळ, मुरूड या परिसरात हे धंदे चालत असल्याची माहिती रायगडच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करीत गांजा व चरसचा 50 किलोहून अधिकचा साठा जप्त केला. अखेर या साठ्याचा नाश करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी घेतला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार, 15 एप्रिल रोजी गांजा व चरस या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. त्यामध्ये गांजा 50 किलो 992 ग्रॅम, चरस एक किलो 47 ग्रॅम असा एकूण 52 किलो 39 ग्रॅम वजनाचा साठा आहे. त्याची किंमत आठ लाख 48 लाख 318 रुपये इतकी आहे. नवी मुंबई येथील मुंबई वेस्ट, मॅनेजमेंट लि. कंपनीमध्ये कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आला.