अमित शहांच्या दौर्यानंतरही घोषणा नाही
| उरण | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर निर्णय होईल, अशी सर्वत्र अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच न झाल्याने हा तिढा तसाच कायम राहिला असून, महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद स्पष्ट होत आहेत.
राज्यात भाजपप्रणित महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठ महिने उलटून गेले असले, तरीही रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप नेमण्यात आलेला नाही. इतर जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा झाली, परंतु रायगडसाठी हा निर्णय लांबणीवर पडलेला आहे. या पदासाठी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटातील आदिती तटकरे यांच्यात चढाओढ सुरू आहे. दोन्ही नेते आपणच पालकमंत्री होणार, असा विश्वास वारंवार व्यक्त करत आहेत.
मात्र, सरकारकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. अमित शहा यांच्या दौर्यानंतर घोषणा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती, पण ती फोल ठरली. सत्तेत असूनही निर्णय न होणे, ही आश्चर्यकारक बाब आहे. भाजपचा केंद्र आणि राज्यात प्रभाव असतानाही रायगडसारख्या ऐतिहासिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरचा निर्णय न होणे, हे महायुतीतील अंतर्गत कुरबुरींचे द्योतक मानले जात आहे. रायगडसाठी कोणाची निवड होणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, निर्णयाचे हे घोंगडे अजूनही तसेच भिजत ठेवण्यात आले आहे.