पसंती क्रमांकांमुळे आरटीओ मालामाल

| पनवेल | वार्ताहर |

पैसे असल्यावर नावासाठी कितीही खर्च करण्याची तयारी असलेले दर्दी आजकाल सर्रासपणे दिसतात. पनवेल परिसरातही अशाच प्रकारे पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी ज्यादा पैसे मोजणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कारण गेल्या दहा महिन्यांत आवडत्या गाडी क्रमांकासाठी पनवेलकरांनी आरटीओला तब्बल 7 कोटी 20 लाखांची रक्कम मोजली आहे.

स्वतःचे वाहन इतरांपेक्षा वेगळे दिसावे, वाहन क्रमांकही लक्षवेधी असावा, अशी हौस अनेकांना असते. नवीन गाडी घेतल्यानंतर पसंतीचा क्रमांक, पूर्ण क्रमांकांची बेरीज यावी, यासाठी हा अट्टहास केला जातो. यासाठी अनेकदा वाट्टेल ती किंमत मोजण्याचीही तयारी असते. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) मिळालेल्या महसुलीच्या आकड्यांवरून हेच स्पष्ट होते. या कालावधीत पनवेलमधील वाहनचालकांनी आवडत्या क्रमांकासाठी तब्बल 7 कोटी 20 लाखांची रक्कम मोजली आहे. त्यात सात या क्रमाकांसाठी एका हौशी वाहनमालकाने दीड लाख मोजले आहेत; तर एकाच नंबरसाठी लाखोंची बोलीही लावली आहे.

लकी नंबरचे फॅड
मोठ्या शहरी भागात 0001 या क्रमांकासाठी 4 लाखांचा दर आहे. पनवेल ओरटीओकडे यंदा याची नोंद झाली आहे. स्पर्धेमुळे तो 12 लाखाला देण्यात आला. त्याचबरोबर सीरिजमध्ये 1, 100, 7, 9, 8055, 4141, 4747 या क्रमांकाला जास्त मागणी असल्याचे पुढे आले आहे.

प्रत्येकाचा एक शुभ अंक असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्हीआयपी नंबरच्या महसुलामध्ये वाढ झाली आहे. ज्यांना पसंतीचा नंबर हवा असतो. त्यांना शासनाने विहित केलेले शुल्क भरून हा क्रमांक आरक्षित करता येतो.

अनिल पाटील
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

वाहनधारक हजारो लाखो रुपये खर्चून फॅन्सी नंबर घेतात; परंतु तो गाडीवर लिहिताना त्यात कलात्मक पद्धतीने बदल करतात. मात्र, परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाहनांवर क्रमांक लिहावा.

गजानन ठोंबरे
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
Exit mobile version