चर्चेतून मार्ग काढण्याचे परिवहन आयुक्तांचे आश्वासन
गुरुवारपर्यंत सकारात्मक चर्चा न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईलः विजय पाटील
। पेण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक-मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने आरटीओ कार्यालय टाळे ठोको, महसूल बंद आंदोलन पुकारले होते. परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारपर्यंत आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनाबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय पाटील यांनी परिवहन खात्याला दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बदली वाहन आदेशावर BS-VI इको टॅक्सी वाहनास इंधन म्हणून CNG पासिंग करावी. पेण, अलिबाग क्षेत्रातील 6+1 वाहनांना 2 वर्षे वयोमर्यादा वाढवून मिळावी. कोरोनामुळे मयत झालेल्या चालक-मालकांना परिवहन विभागाकडून मदत मिळावी. कोव्हिड महामारीत 3+1 परवानाधारकांना शासनाकडून रु.1,500/- सानुग्रह अनुदान मिळाले, तेच अनुदान विक्रम, मिनिडोअर, मॅजिक, इको या मीटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे; त्यात दुजाभाव नसावा. व्यवसाय करावरील व्याज व चक्रवाढ व्याज न आकारता मूळ व्यवसाय कर आकारला जावा. कोव्हिड काळात ज्या परवान्याची मुदत संपली आहे व वाहन पासिंग करण्यायोग्यतेचे नाही, असे परवाने नूतनीकरण करताना व वाहन स्क्रॅप करताना योग्यता प्रमाणपत्र व विमा प्रमाणपत्राची मागणी न करता वस्तुस्थितीचा निकष लावून परवान्याचे नूतनीकरण करावे. NIC मार्फत संगणक प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात यावी. R.T.A. क्षेत्रात रु. 500/- शुल्क आहे. मात्र, M.M.R.T. कार्यक्षेत्रातील टॅक्सी परवाना हस्तांतरण शुल्क रु.25,000/- आहे, या शुल्कात कपात करावी. मीटर कॅलिब्रेशन सुविधा केंद्र, पेण येथे सुरु करावी या मागण्यांकरिता सोमवार, दिनांक 24 जानेवारी रोजी पेण आर.टी.ओ. कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन पुकारले होते.
सोमवारी सकाळपासूनच विक्रम मिनिडोअर ईको चालक-मालक हजारोंच्या संख्येने पेण येथील आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलनाकरिता जमले. आपल्या न्याय्य हक्कासाठी घोषणा दिल्या. यावेळी परिवहन विभागाच्या अधिकार्यांना त्यांनी कार्यालयात जाण्यापासून रोखले व आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आरटीओ कार्यालयाचे महसूल बंद करण्यासाठी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिला.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, खजिनदार सचिन पाटील, सचिव विकास पारंदे, राजीव भंडारी, राकेश राखाडे, सुधाकर यादव, शंकर पाटील, किशोर पाटील, दीपक म्हात्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येत सदस्य सामील झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे स्वतः जातीने हजर होते, तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांशी आंदोलनस्थळी सकारात्मक चर्चा केली, असून, त्यांच्या मागण्या परिवहन आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या आहेत. आयुक्तांनी लेखी पत्र देऊन विक्रम मिनिडोअर ईको चालक-मालकांच्या समस्या चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याकरिता येत्या गुरुवारी, शुक्रवारी प्रशासकीय अधिकारी व विक्रम मिनिडोअर ईको संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन योग्यतो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. – महेश देवकाते, उपविभागीय परिवहन अधिकारी, पेण
परिवहन आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर पुकारलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मात्र, आगामी होणार्या बैठकीत विक्रम मिनिडोअर चालकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. – विजय पाटील, जिल्हाध्यक्ष







