| नवी मुंबई | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने नवी मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात. परंतु या काळात प्रवाशांना खासगी बसमध्ये प्रवास करण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिकचे पैसे द्यावे लागतात, परंतु अशा पद्धतीने प्रवाशांची लूट करणार्या खासगी वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि वाहन सुरक्षा नियमानुसार, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. आरटीओने मागील सात दिवसांत 1 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांच्या होणार्या लूटमारीला चाप बसला आहे.
अनेकदा सणासुदीच्या किंवा उत्सवाच्या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी बसवाहतूकदार प्रवाशांकडून तिप्पट रक्कम आकारतात. मुंबई-पुणे, पुणे-नागपूर, औरंगाबाद-मुंबई, कोल्हापूर-नागपूर आणि सोलापूर-नाशिक या मार्गांसह अन्य मार्गांवर प्रवास करण्यासाठी अनेकदा प्रवाशांची खाजगी बस वाहतूकदारांकडून लूट होत होती. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 11 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत मोहीम हाती घेतली होती. यात मागील सात दिवसांत 82 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने एप्रिल 2018 मध्ये निर्णय घेत खासगी बस वाहतूकदारांवर बंधने आणली. या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या तिकीटदराच्या तुलनेत खासगी वाहतूकदारांना केवळ दीडपट तिकीट दर आकारण्याचे बंधन घातले आहे. त्यापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित वाहतूकदारांवर कारवाई केली जाते.
हेमांगिनी पाटील,आरटीओ अधिकारी