पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसले, तरीदेखील आपल्या जिद्दीच्या जोरावर जनसेवा करण्याचा ध्यास मनात बाळगला. महाड तालुक्यातील रुचिका शिर्के हिने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. यातून आपत्तीच्या काळात अनेकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
रुचिका शिर्के या इसाने कांबळे तर्फे महाड येथील रहिवासी आहेत. त्यांनी शाळेत असतानाच पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु, कमी उंचीमुळे त्या पोलीस होऊ शकल्या नाहीत. मात्र, तितक्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी लोकसेवा करण्याची संकल्पना मनात बाळगली. ती पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न त्यांनी केला. 2016 मध्ये रेस्न्युअर म्हणून त्या काम करू लागल्या. कोणत्याही संस्थेमध्ये सहभागी न होता, आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी सुरू केले. आपद्ग्रस्तांना मदत करण्याबरोबरच त्या महाड येथील रिगल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यामार्फत ‘आपदा सखी’ म्हणून काम करू लागल्या. महाडसह वेगवेगळ्या भागात त्या आपदा सखी म्हणून सेवा देण्याचे काम करीत आहेत. आपत्तीच्या वेळी कोणी कोणाचा नसतो. परंतु, शिर्के या आपदा सखी म्हणून अनेकांच्या मदतीला धावून जात आहेत.